कर्नाटकात खाणकामासाठीची स्फोटके नष्ट करताना स्फोट; 6 जणांचा मृत्यू

बंगळूर – कर्नाटकमध्ये मंगळवारी खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांच्या स्फोटात 6 जण मृत्युमुखी पडले. पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीने ती स्फोटके नष्ट करण्याच्या कृत्याने संबंधितांचा जीव घेतला.

कर्नाटकच्या चिक्कबल्लापूरजवळ असणाऱ्या गावातील दगड खाणीत स्फोटाची घटना घडली. त्या खाणीत काम करणाऱ्या मजुरांनी जिलेटीन कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भीषण स्फोट झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी अवैध खाणकामावर बंदी घातली आहे. त्यानंतरही जिलेटीन कांड्यांचा वापर करून सर्रास खाणकाम सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून छापासत्र हाती घेतले जात आहे. त्या छाप्यांच्या भीतीपोटी जिलेटीन कांड्यांचा साठा नष्ट करण्याचे प्रकार घडत आहेत. याआधी महिनाभरापूर्वी त्या राज्यातील शिमोगा येथील खाणीत स्फोट होऊन 6 जण मृत्युमुखी पडले होते. दरम्यान, स्फोटाच्या ताज्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी दु:ख व्यक्त केले. संबंधित घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही येडियुरप्पा यांनी दिले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.