मेक्‍सिकोतील ड्रग माफिया अल चापोच्या पत्नीला अमेरिकेत अटक

वॉशिंग्टन – मेक्‍सिकोतील कुख्यात ड्रग माफिया अल चापो याची पत्नी आणि अभिनेत्री एम्मा कोरोनेल असपुरो हिला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. व्हर्जिनिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला अटक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी केल्याचा तिच्यावर आरोप आहे, असे न्याय विभागाने म्हटले आहे. जोक्‍वीन अल चापो ग्युझमन हा त्याच्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या मोठ्या रॅकेटमुळे अंडरवर्ल्डमध्ये कुख्यात आहे. त्याच्या ड्रग माफियाचे जाळे मेक्‍सिकोसह इतरही अनेक देशांमध्ये पसरलेले आहे. त्याची पत्नी एम्मा ही देखील या ड्रग माफियाची हस्तक आहे. तिच्याकडे अमेरिका आणि मेक्‍सिको या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. व्हर्जिनिया प्रांतातील ड्युल्लस आंतरराष्ट्रीय विमानतळावर ती येणार असल्याचे समजल्यामुळे तेथेच तिला अटक करण्यात आली. वॉशिंग्टनमध्ये फेडरल न्यायालयात तिला हजर केले जाण्याची शक्‍यता आहे.

एम्मा हिच्यावर ड्रग माफियाबरोबरच 2015 मध्ये मेक्‍सिकोच्या तुरुंगातून अल चापो याला पळून जाण्यास मदत केल्याचाही आरोप आहे. गुझमन याला 2017 साली अमेरिकेच्या स्वाधीन केले गेले. त्यापूर्वीही आणखी एकदा तो तुरुंगातून पळून गेला होता. त्याही प्रकरणी त्याला मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

2019 मध्ये गुझमनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्या सिनालोआ कार्टेलला 25-वर्षांच्या कारकिर्दीत अमेरिकेत कोकेन आणि इतर मादक पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यास जबाबदार धरले होते. गुझमनच्या सशस्त्र सुरक्षा दलांनी त्याच्या आदेशांवरून अपहरण, छळ आणि हत्यासारखे अनेक गुन्हे केल्याचाही आरोप आहे. त्याची पत्नी एम्मा ही कोकेन, मेथाम्फेटामाईन, हेरॉईन आणि मारिजुआना सारख्या अमली पदार्थाम्च्या तस्करीच्या कामात गुंतलेली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.