सावध व्हा…! करोना डोईजड होतोय

एकाच दिवशी 159 रुग्ण पॉझिटिव्ह; महापालिकेकडून करोना सेंटर सुरू करण्याच्या हालचाली

नगर (प्रतिनिधी) – नगर शहरासह जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढू लागला असून जिल्ह्यात आज दिवसभरात 159 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. करोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेने करोना सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 74 हजार 797 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 97. 37 टक्के इतके असले तरी आज रुग्णसंख्येत 159 ने वाढ झाली आहे. त्यामुळे आता उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या ही 882  इतकी झाली आहे. तर, मृत्यूची एकूण संख्या एक हजार 124 असून हे प्रमाण 1.51 टक्के आहे.

त्यामुळे शहरात महापालिका प्रशासनाकडून करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मनपाच्या मुकुंदनगर, केडगाव, नागापूर, तोफखाना, सावेडी या सातही आरोग्य केंद्रात स्त्राव संकलन करण्यात येत आहे. तसेच, नटराज हॉटेल व जैन-पितळे बोर्डिंग येथे येत्या दोन दिवसांत पुन्हा करोना सेंटर करण्यात येणार आहे. याशिवाय बसस्थानक, भाजीमंडई, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी औषध फवारणीस सुरुवात झाली आहे.

तसेच, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दुकाने चालू राहणार आहेत. याबाबत 29 जानेवारीला दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हे कराच…

विवाह सभारंभ, धार्मिक कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक संख्या नको. टेबल खुर्च्या निर्जंतुकीकरण करा. कार्यक्रमासाठी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनरद्वारे स्क्रिनिंग करा. दोन व्यक्तीमध्ये सहा फुटाचे अंतर राखा. शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

विनामास्क फिरणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. करोनाचे लक्षण जावणल्यास ताबडतोब उपचार घ्यावेत.
डॉ. राजेंद्र भोसले
जिल्हाधिकारी

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नटराज हॉटेल येथे 100 बेड व जैन-पितळे बोर्डिंग येथे 70 बेडचे येत्या दोन दिवसांत महिलांसाठी महापालिकेचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रात स्त्राव संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
अनिल बोरगे
आरोग्याधिकारी, महापालिका.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.