एक हजार नागरिकांची होऊ शकते सोय ; शासनाला गरज पडल्यास उपयोग
वाघोली-करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असताना आता याला हातभार लावण्यासाठी सामाजिक संस्था देखील पुढे आल्या आहेत. वाघोली येथील भारतीय जैन संघटना शैक्षणिक संकुलात जवळपास एक हजार क्वारंटाइन नागरिकांच्या निवासी व्यवस्थेसाठी हॉस्टेल सज्ज करण्यात आले आहे. शासनाला गरज पडल्यास क्वारंटाइन नागरिकांसाठी या हॉस्टेलचा उपयोग केला जाऊ शकतो.
या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असणारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच मेळघाटातील मुले शाळेला सुट्टी असल्यामुळे गावी गेलेली आहेत. हॉस्टेल रिकामे असल्यामुळे याठिकाणी क्वारंटाइन नागरिकांची सोय उत्तम होऊ शकते. परदेश दौऱ्याहून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकाच ठिकाणी एक हजार क्वारंटाइन नागरिकांची व्यवस्था या अद्ययावत हॉस्टेलमध्ये होऊ शकेल, असा विचार आमच्या मनात आला आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने हे हॉस्टेल उपलब्ध करुन देऊन शासनाला जर योग्य वाटलं तर शासन या ठिकाणी एक हजार नागरिकांची निवासाची व्यवस्था करू शकते असे बीजेएसचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी सांगितले.
- क्वारंटाइन व्यक्तींसाठी व्यवस्था, करोना बाधितांसाठी नाही
वाघोली येथील बीजेएस शैक्षणिक संकुलातील हॉस्टेलमध्ये परदेश दौऱ्याहून आलेल्या अथवा शासनाने होम क्वारंटाइनसाठी सुचविलेल्या व्यक्तींचीच सोय होणार आहे. करोनाने बाधित झालेल्या नागरिकांसाठी उपचाराची यंत्रणा याठिकाणी नाही. बीजेएसने घेतलेल्या निर्णयाबाबत अनेकांनी कौतुक केले आहे तर वाघोलीतील काही नागरिकांना भीती सतावू लागली असल्याने त्यांनी घाबरण्यासारखे काही नाही. याठिकाणी फक्त क्वारंटाइन व्यक्तींसाठी व्यवस्था असून करोना बाधितांची सोय होणार नसल्याचे बीजेएस संकुलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.