शिलॉंग – मेघालयातील कॉंग्रेसचे पाच आमदार भाजपचा पाठिंबा असलेल्या एमडीए आघाडीमध्ये सहभागी झाले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसमधील 17 आमदारांपैकी 12 आमदार गेल्यावर्षी तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश होता. त्यामुळे कॉंग्रेस पक्षामध्ये 5 आमदारच शिल्लक राहिले होते. आता कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाने मुख्यमंत्री कनराड के संगमा यांना पाठिंबा दिल्याचे अधिकृत पत्रच सादर केले आहे.
“मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स’ या आघाडीला आम्ही आजपासून पाठिंबा देत आहोत. मुख्यमंत्री आणि “एमडीए’ आघाडी सरकार सक्षम करण्यासाठी आम्ही सरकारला पाठिंबा देत आहोत, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी निर्णयप्रक्रिया सोपी आणि परिणामकारक व्हावी, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. या पत्रावर कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अमपारीन लिंगडोह आणि अन्य चार आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखालील “एमडीए’आघाडीला भाजपचे आमदार सांबोर शुलाई यांनी पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारमध्ये ते मंत्रीदेखील आहेत.