पुणे – नुकत्याच पार पडलेल्या कसबा निवडणुकीची चर्चा काही केल्या थांबताना दिसत नाही. या पोटनिवडणुकीमुळे कसबा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. भाजपसाठी हा मोठा धक्का होता कारण गेल्या २८ वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपचा गड राहिलेला आहे. मात्र आता पुन्हा एकदा या मतदारसंघांची चर्चा सुरु झाली आहे. कारण आहे कसब्यात झळकलेले फ्लेक्स.
पोट निवडणुकीत पराभव झाला असला तरी हेमंत रासने यांनी आता २०२४ ची तयारी सुरु केल्याचे समजते. यासंदर्भातील काही बॅनर देखील कसब्यात झळकल्याचे पाह्यलं मिळते. ‘पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ नाशवंत नाही’ अशा आशयाखाली कसब्यात बॅनर झळकल्याचे पाहायला मिळते.
कसब्यातील या बॅनरबाजीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या या बॅनरबाजीवर कसब्यात प्रत्येक प्रभागात जनसंपर्क कार्यालय उभारणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पोट निवडणुकीनंतर देखील कसब्याची चर्चा काही केल्या थांबताना दिसत नाही.