पुणे – गेल्या काही वर्षामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 40 ते 45 आमदार भाजपमध्ये गेले. येत्या काळात पक्षनेतृत्वाला सांगून त्यातले काही आमदार मूळ पक्षात प्रवेश करु शकतात. शेवटी माणसांकडून चुका होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, आपल्या हक्काची काही मते तसेच काही पक्षाची मते यांच्या भरोशावर निवडून येणे त्याकाळी संबंधित नेत्यांना सोपे गेले. शेवटी एखाद्या आमदाराला मतदारसंघाचा विकास करायचा असतो. त्याला जनतेला कामे दाखवायची असतात. पूर्वीच्या काळासारखं एखाद्या विचारधारेला मानून विरोधात राहिले तरी चालेल पण पक्ष सोडणार नाही, अशी लोकांची आता मानसिकता राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मागील काळात झालेल्या चुका संबंधित लोक सुधारु शकतात, असं सांगताना भाजपमधील अनेक आमदारांची येत्या काळात घरवापसी बघायला मिळू शकते, असे संकेतच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिले.
पवार म्हणाले, आमच्यातले काही नेते 2014 ला आम्हाला सोडून गेले, काहींनी 2019 ला पक्ष बदलला. 2014 ला भाजपने एक असं चित्र निर्माण केले की नरेंद्र मोदींचा करिष्मा संपूर्ण भारतावर निर्माण झालाय आणि ते सत्तेत आल्यावर खूप मोठे बदल होतील, असा भ्रम निर्माण केला गेला. राजीव गांधीनंतर देशात कुणालंही असं बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे ज्यांना राजकारण करायचंय पण त्यांना फक्त आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवायचाय, त्यांना मतदारसंघात विकास करायचाय, असे लोक त्यावेळी भाजपमध्ये गेले. पण आता बदलत्या परिस्थितीत तिकडे गेलेले लोक पुन्हा मूळ पक्षात परतू शकतात. ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना सांगू शकतात. आमची चूक झाली. शेवटी माणसांकडूनच चुका होतात. तालुक्याचा-जिल्ह्याचा विकास व्हावा, म्हणूनच लोक पक्ष सोडण्याचे निर्णय घेत असतात. पूर्वीसारखं पक्षाच्या विचारधारेला चिकटून लोक आता राहत नाहीत, राजकारणात कालचा शत्रू आज मित्र असतो आणि आजचा मित्र उद्या शत्रू असतो, असे पवार म्हणाले.
कसबामुळे महाविकास आघाडीत उत्साह
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करुन महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजय खेचून आणला. मागच्या 28 वर्षांपासून कसबा हा भाजपचा गड होता. तिथल्या मतदारांचं एकगठ्ठा मतदान भाजपला होत आलेलं आहे. परंतु यावेळी मतदारांनी भाजपला नाकारले. त्यामुळे मरगळ आलेल्या विरोधी पक्षामध्ये उत्साह संचारला आहे. याच उत्साहाच्या बळावर आरुढ व्हायची युक्ती विरोधक करीत असल्याचं दिसून येतंय.