नवी दिल्ली – भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज ‘जसप्रीत बुमराह’ बऱ्याच दिवसांपासून दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे बुमराहला आशिया कप 2022, T20 विश्वचषक 2022 मधून देखील बाहेर राहावे लागले होते. दरम्यान, नुकतंच न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरातील हॉस्पिटलमध्ये जसप्रीत बुमराहवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बुमराह स्ट्रेस बॅक फ्रॅक्चरने हैराण होता. मात्र, आता जसप्रीत बुमराहच ऑपरेशन यशस्वी झालं आहे.
दरम्यान, जेव्हा-जेव्हा भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाजांची चर्चा होते, तेव्हा जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज नक्कीच लक्षात येतो. जसप्रीत बुमराहने गेल्या 4-5 वर्षांत भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी एका वेगळ्या उंचीवर नेली असल्याचं दिसून आलं आहे. दुखापतीमुळे तो गेल्या 8 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानाबाहेर होता.
मात्र, आता बुमराह लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. जसप्रीत बुमराहची यशस्वी शस्त्रक्रिया ही भारतीय संघ आणि बीसीसीआयसाठी आगामी काळासाठी एक चांगली बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहला पूर्णपणे फिट होण्यासाठी जास्तीत जास्त 24 आठवडे म्हणजे 6 महिने लागतील असं देखील सांगण्यात आलं आहे.