भाजपच्या अडचणीत होणार वाढ ? ; चिराग पासवान यांचे अमित शाहांना पत्र

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. मात्र, एनडीए आणि महाआघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी जागा वाटपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच पत्र लिहिले आहे. अपेक्षित जागा न मिळाल्यास जदयू विरोधात उमेदवार देण्याचे संकेत पासवान यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एनडीएतील जागा वाटपासंदर्भात लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याविरोधी वातावरण असल्याचे चिराग पासवान यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चिराग पासवान यांनी जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित करत अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.

चिराग पासवान यांनी ३३ जागांची मागणी केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्याबरोबरच राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या जागांपैकी २ जागांचीही मागणी केली आहे. अपेक्षित जागा न मिळाल्यास मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूविरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बिहारमधील एनडीएत अस्वस्थता निर्माण झाली आहे. चिराग पासवान यांनी भाजपा नेतृत्त्वाला यापूर्वीच एक फॉर्म्युला सुचवलेला होता. लोजपाला राज्यसभेची जागा न दिल्यास विधानसभेच्या जागा वाटपांची घोषणा करतानाच बिहारमध्ये एनडीएचे सरकार आल्यास भाजपाबरोबर लोजपातून चिराग पासवान यांना उपमुख्यमंत्री करण्याचीही घोषणा करावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.