BJP-TDP Alliance : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी, भारतीय जनता पक्षाला (भाजप) दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा आपल्या जुन्या मित्रपक्षाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते राजधानीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या या भेटीमुळे चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा आपल्या हाती कमळ घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत परत येऊ शकते. दरम्यान, याविषयी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे मान्य केले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या या संदर्भात कोणतीही घोषणा किंवा अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासोबतच्या प्रस्तावित भेटीत आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या युतीच्या पद्धतींवर चर्चा होऊ शकते, असे निश्चितपणे सांगण्यात आले. आंध्रमधील लोकसभेच्या एकूण 25 जागांपैकी भाजपने 10 जागा मागितल्या आहेत, तर सध्या या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. बुधवारच्या बैठकीनंतर या युतीबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान या अगोदर रविवारी तेलगू देसम पार्टीचे सुप्रीमो एन. चंद्राबाबू नायडू आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेश विधानसभा आणि लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाबद्दल चर्चा केली होती. तर दुसरीकडे एका वृत्तवाहिनीनुसार दोन्ही नेते चंद्राबाबू नायडू यांच्या उंडवल्ली येथील निवासस्थानी दोन्ही नेत्याची भेट झाली असून दोघामंध्ये ३ तास चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षांकडून लढवल्या जाणाऱ्या जागांवर व्यापक एकमत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, बैठकीच्या निकालावर टीडीपी आणि जनसेनेकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
एन. चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वी 14 जानेवारी रोजी जनता सेना पक्षाचे (जेएसपी) नेते आणि अभिनेते पवन कल्याण यांच्यासमवेत अमरावती येथील मंदाडम येथे भोगी सोहळ्यात बोलताना , आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) सरकारचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. अंधार दूर होऊन राज्यात सोनेरी राजवट येईल. असे म्हटले होते.