कॉंग्रेसने सुरू केलेल्या खेळाचा शेवट भाजप करेल

शिवराजसिंह चौहान यांचा इशारा

श्रीनगर – मध्यप्रदेशात कॉंग्रेसने सुरू केलेल्या खेळाचा शेवट भाजप करेल, असा इशारा त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिला आहे. त्यामुळे कर्नाटकपाठोपाठ मध्यप्रदेशातही राजकीय घडामोडींना पुढील काळात वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मध्यप्रदेश विधानसभेत अलिकडेच भाजपच्या दोन आमदारांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपच्या ऐक्‍याला तडा गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातून कॉंग्रेसने भाजपला आव्हान दिल्याचेही मानले जात आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असणाऱ्या चौहान यांनी जम्मू-काश्‍मीर दौऱ्यावेळी येथे पत्रकारांशी बोलताना एकप्रकारे कॉंग्रेसला प्रतिआव्हान दिले. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसला बहुमत मिळाले नाही.

त्यामुळे भाजपने ठरवले असते तर कॉंग्रेसला सरकार स्थापन करता येऊ शकले नसते. त्या पक्षाने सप, बसपला बरोबर घेऊन सरकार स्थापन केले. कॉंग्रेसपेक्षा थोड्याच जागा कमी मिळाल्या असल्याने सरकार स्थापनेचे प्रयत्न न सोडण्याचा आग्रह माझ्या काही सहकाऱ्यांनी धरला. मात्र, मी विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसने सरकार स्थापन केल्यानंतर मध्यप्रदेशात लुट करण्यापलिकडे काही घडलेले नाही. त्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न आम्ही कधीच केला नाही. पण, आता कॉंग्रेसने जे काही सुरू केले आहे; त्याला आम्ही पूर्णविराम देऊ, अशी आक्रमक भूमिका चौहान यांनी मांडली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)