एलओसीलगत घुसखोरीचा डाव उधळला; जवान शहीद

श्रीनगर -भारतीय लष्कराने शनिवारी जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडलेल्या त्या घटनेवेळी एक जवान शहीद झाला. पाकव्याप्त काश्‍मीरमधून आलेल्या दहशतवाद्यांच्या गटाने भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. ती घटना काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मच्छिल क्षेत्रात घडली.

त्या क्षेत्रात तैनात असलेल्या सतर्क भारतीय जवानांनी वेळीच दहशतवाद्यांचा डाव हेरला. जवानांनी आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यात एक जवान मृत्युमुखी पडला. जवानांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराला घाबरून दहशतवाद्यांनी माघारी पलायन केले. त्यामुळे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. मात्र, त्या घटनेबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.