लखनोै – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशात सरकारी निधीचा अपव्यय करून त्यातून मोठ्या प्रमाणात राजकीय जाहीरातबाजी केली असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे.
आमचा पक्ष सत्तेवर आल्यानंतर या गैरप्रकाराची व्यापक चौकशी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की सरकारच्या माहिती विभागाने सरकारच्या विकास कामांच्या जाहीराती करणे अपेक्षित असते.
त्यांनी राजकीय जाहीराती करणे बेकायदेशीर ठरते असे ते म्हणाले. सध्या राज्य सरकारचा माहिती विभाग हा भाजपचाच प्रचार विभाग झाला आहे असे त्यांनी नमूद केले. उत्तरप्रदेशात भाजप सत्तेवर आल्यापसून त्यांनी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करण्याखेरीज काहीही केलेले नाही असे ते म्हणाले.
आम्ही जेव्हा सत्तेवर होतो त्यावेळी आम्ही सरकारी पैशाचा अशा प्रकारचा दुरूपयोग कधीही केलेला नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाने मात्र सरकारचा निधी अत्यंत बेदरकार पद्धतीने राजकीय प्रचारासाठी केला असून या प्रकरणातील दोषींवर आमचे सरकार कारवाई करेल असे त्यांनी नमूद केले.