पुणे – नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठेवण्यात आलेल्या अँमिनिटी स्पेस 30 वर्षाच्या भाडे कराराने देण्याचा सत्ताधारी भाजपाने घेतलेला निर्णय हा पुणेकरांच्या हिता विरुद्ध आहे. उत्पन्न वाढीसाठी म्हणून खोटे दिखाऊ आकडे जनतेपुढे मांडून त्यातून शेकडो कोटी रुपये मिळणार आहे, असा अभास ते निर्माण करीत आहेत.
जनतेच्या हितासाठी उपयोगी पडणारे अनेक प्रकल्प या अँमिनिटी स्पेसवर उभारता येऊ शकत असतानाही विशिष्ट लोकांच्या व व्यावसायिकांच्या फायद्यासाठी अश्या पद्धतीने अँमिनिटी स्पेस 30 वर्षाच्या कराराने देण्याचा घाट त्यांनी घातला असून उत्पन्न वाढीबद्दल जर का त्यांना एवढेच प्रेम आहे, तर त्यांनी केवळ अँमिनिटी स्पेसच कश्याला पूर्ण पुणे शहरच विकून टाकावे. म्हणजे त्यांचा मालामाल होण्याचा मार्ग मोकळा होईल. असे परखड मत पुणे महानगरपालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल यांनी व्यक्त केले.
बागूल म्हणाले की, दीर्घकाळ कॉंग्रेस पक्ष सत्तेत असल्यापासून अँमिनिटी स्पेस ह्या नागरिकांच्या हितासाठी राखून ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती आरक्षण जरी नसले तरी विविध नागरी हिताचे प्रकल्प तेथे उभे करता येणे सहज शक्य असते. त्या अँमिनिटी स्पेसवर अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता ही घ्यावी लागत असते.
अश्यावेळी या अँमिनिटी स्पेसचा उपयोग नागरिकांच्या हिताचे प्रकल्प तेथे उभारण्याच्या ऐवजी उत्पन्न वाढीच्या गोंडस नावाखाली या अँमिनिटी स्पेस 30 वर्षासाठी हितसंबंधीना देण्याचे त्यांचे धोरण हे पुणे शहराच्या दृष्टीने अतिशय चुकीचे व घातक आहे. त्यामुळे तातडीनं हा निर्णय रद्द करावा अन्यथा वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा बागूल यांनी दिला आहे.