महाराष्ट्र विकास आघाडीला यश
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या एकत्रित ताकदीमुळे पुन्हा एकदा भाजपला धक्का दिला आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेवर अखेर महाराष्ट्र विकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.
अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, अद्याप औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. संख्याबळ जुळत नसल्याने भाजपने अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.
सर्वसाधारण महिला प्रवर्गसाठी अध्यक्ष पद राखीव आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीचे 43 विरुद्ध भाजप 18 अशी चुरस दिसून आली. यात शिवसेनेने अध्यक्षपदासह दोन सभापती पद मागितले, तर राष्ट्रवादीने एकच उपाध्यक्ष पद मागितले. कॉंग्रेसने बांधकाम आणि महिला बालकल्याण हे दोन पद मागितले. या निवडणुकीत कॅबिनेट मंत्री संजय राठोड, कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, राष्ट्रवादीचे मनोहर नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
मुंबई, नाशकात फडकला भगवा
मुंबई आणि नाशिकमध्ये रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 141 मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने जागा राखली आहे. या प्रभागातून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत.
तर नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. या ठिकाणीही महाराष्ट्र विकास आघाडीने यशस्वीपणे यश मिळविले.
त्यामुळे शिवसेनेने जागा राखली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून मनसेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते. तर या प्रभागात भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला.