- भाजपचे युवक कार्यकर्ते राष्ट्रवादीत
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली आहे. त्यापूर्वी भाजपला भोसरी मतदारसंघातून आणखी एक हादरा बसला आहे. भाजपचे युवक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भाजपा सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
गुरूवारी (दि. 23) मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बोऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती घेतले. युवक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने अनेक भाजपमधील युवक राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याचा फटका भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला बसू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.