सांगली – अजित पवारांच्या आधी जयंत पाटील यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देत भाजपमध्ये प्रवेश करण्याची विनंती करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी व राजारामबापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑफर दिली होती, असा दावाही त्यांनी केला. दीड वर्षांपूर्वी फडणवीस यांनी जयंत पाटलांना ही ऑफर दिली होती आणि या ऑफरबाबत खुद्द जयंत पाटलांनी आपल्यासह सहकाऱ्याशी चर्चा देखील केली होती, असेही ते म्हणाले.
सांगली येथील कुरळपमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. पी आर पाटील म्हणाले, जयंत पाटलांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्धार करत फडणवीस यांची ऑफर धुडकावून लावली होती. आताही जयंत पाटलांच्या बाबतीत सुरू असणाऱ्या अफवा असून त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या भाजपत जाण्याची चर्चा सुरू झाल्यावर जयंत पाटलांनी आपण भाजपात जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशावर तुर्त पडदा पडलेला असताना आता त्यांचेच विश्वासू सहकाऱ्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.