अहमदाबाद – काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या पाचही आयाराम आमदारांना आज पक्षातर्फे आगामी विधानसभा पोट-निवडणुकांसाठी त्यांच्याच मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली. यावर्षी जूनमध्ये काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. येत्या ३ नोव्हेंबरला या रिक्त जागांसाठी पोट निवडणुका होणार आहेत.
गुजरातेतील अब्दासा, लिमडी, मोरबी, धारी, गधडा (एससी), करंजन, डंगस (एसटी) आणि कापराडा (एसटी) या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक आयोगाने पोट-निवडणुका जाहीर केल्या आहेत.
या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सात जागांवरील उमेदवारांची यादी आज भाजपने जाहीर केली.
यावर्षी जूनमध्ये काँग्रेसला रामराम ठोकत प्रद्यौमसिंह जडेजा, ब्रिजेश मेरजा, जे व्ही काकडिया, अक्षय पटेल आणि जितू चौधरी यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पाचही माजी आमदारांना भाजपने अनुक्रमे अब्दासा, मोरबी, धारी, करंजन आणि कापराडा या मतदारसंघांमध्ये उमेदवारी दिली. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे पाचही आमदार याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.
आठपैकी सोमा पटेल (लिंबडी), मंगल गावित (डंगस) , प्रवीण मारू (गधडा) या तीन आमदारांनी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाही. आज घोषित केलेल्या यादीत भाजपने माजी मंत्री आत्माराम परमार डंगस येथून तर माजी आमदार विजय पटेल यांना गधडा येथून उमेदवारी जाहीर केली आहे.