मुंबई – शरद पवार हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप आहेत. 2019 विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी भाजपच्या 105 आमदारांना बेकार करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तेव्हाच बाप कोण आहे, हे सिध्द झाले आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पुण्यामध्ये आयोजित एका पक्षांतर्गत कार्यक्रमावेळी बोलताना पाटील यांनी, “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांमध्ये अजित पवार यांना टोला लगावला होता.
या टीकेला आज राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल माध्यमाव्दारे प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी फेसबुक व ट्विटरवर पोस्ट करताना म्हटले आहे की, काल भाजपाच्या एका महाशयाने, “आम्ही तुमचे बाप आहोत” असे वक्तव्य केले. त्यांच्या माहिती करता 2019 चे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2022 साली पुणे मनपात पुण्याची जनता अजित दादा पवार हे तुमचे बाप आहेत हे सिद्ध करून दाखवेल काळजी करू नका.
काय तर म्हणे, आम्ही तुमचे बाप आहोत. 2019 वि.स. निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून मविआ सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
2022 झाली पुणे मनपात पुण्याची जनता अजितदादा पवार हेच तुमचे बाप आहोत हे सिद्ध करून दाखवेल.— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 11, 2020
दरम्यान, आता येथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील हे शाब्दिक युध्द आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच आता अमोल मिटकरी यांना चंद्रकांत पाटील काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.