गटबाजी थांबविण्यात मोहिते-पाटील ठरले अपयशी
सोलापूर – मोहिते-पाटील यांच्या माळशिरस नगरपंचायतमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला दणका दिला आहे. गटबाजीमुळे बहुमत असूनसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत आली आहे. मोहिते-पाटलांच्या माळशिरसमध्ये सत्तेचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.
भाजपमधील गटबाजी थांबविण्यात मोहिते-पाटील यांना अपयश आल्यामुळे भाजप बंडखोर आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादीचे शिवाजी देशमुख उपनगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. आता कोणीही या आघाडीत हस्तक्षेप करू शकणार नसून पाच वर्षे भाजप-राष्ट्रवादी आघाडी एकत्रित कारभार करणार असल्याचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले.
भाजप आणि राष्ट्रवादी राज्यात एकत्रित येण्याबाबत चर्चा सुरू असतानाच मोहिते-पाटील यांच्या माळशिरसमध्ये भाजप-राष्ट्रवादी युती सत्तेत आली आहे. त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने भाजपने गुलाल उधळल्यामुळे राज्यात एक अजबच चित्र निर्माण झाले आहे.
यावर भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ही घटना नगरसेवकांच्या गैरसमजातून झाली आहे. त्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला फायदा होऊ देणार नाही, असे मत व्यक्त केले आहे. माळशिरस नगरपंचायतीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी 2, इतर व अपक्ष 5 असे पक्षीय
बलाबल आहे.