BJP MP joins Thackeray group : लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत भाजपला जबर झटका बसला आहे. भाजपचे जळगावचे खासदार उन्मेश पाटील बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या हातात शिवबंधन बांधतील, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनाक्रमामुळे भाजपच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांची चिंता वाढली आहे. पण त्यांनी जनता आपल्या पाठिशी असल्यामुळे निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
खासदार उन्मेश पाटील यांनी मंगळवारी दुपारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले. या भेटीत त्यांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एका ट्विटद्वारे उन्मेश पाटील यांचा बुधवारी दुपारी 12.30 वाजता पक्षप्रवेश होणार असल्याची पुष्टी केली आहे. दुसरीकडे, उन्मेश पाटलांच्या या भूमिकेवर भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. | BJP MP joins Thackeray group
स्मिता वाघ म्हणाल्या की, संजय राऊत हे उन्मेश पाटील यांचे मित्र आहेत. त्यामुळे ते त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेलेत. ते पक्षाविरोधात असा एखादा निर्णय घेतील असे मला वाटत नाही. आज माझा प्रचार आहे. पण उन्मेश पाटील भाजपमध्येच राहतील असा माझा ठाम विश्वास आहे. | BJP MP joins Thackeray group
जनता माझ्याच पाठिशी राहणार
स्मिता वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की, कुणी कसे जीवन जगावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी माझ्या तत्वांशी केव्हाही तडजोड केली नाही. मी पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे पक्षाशी निष्ठा बाळगणारा प्रत्येकजण माझ्यासारख्या कार्यकर्तीच्या मागे राहील. उन्मेश पाटील ठाकरे गटात गेले आणि तिथे त्यांना उमेदवारी मिळाली तरी जनता माझ्या पाठिशी राहील यात कोणतीही शंका नाही. | BJP MP joins Thackeray group