पुणे – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुणे महापालिका परिसरात धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह 11 जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात सर्वांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी सुरूवातीला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एस.व्ही. दिंडोकर यांनी सर्वांना प्रत्येकी साडेसात हजार रूपयांचा जामीन मंजुर केला. बचाव पक्षातर्फे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी बाजू मांडली. त्यांना उपाध्यक्ष ऍड. सचिन हिंगणेकर आणि सचिव ऍड. विकास बाबर यांनी सहाय्य केले.
संजय हरिश्चंद्र मोरे, किरण प्रकाश साळी, सुरज मथुराम लोखंडे, आकाश चंद्रकांत शिंदे, रूपेश आनंदराव पवार, राजेंद्र दामोदर शिंदे, निलेश दशरथ गिरमे , मुकुंद पांडुरंग चव्हाण, अक्षय शरद फुलसुंदर, निलेश हनुमंत जगताप आणि सनि वसंत गवते अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एकुण 60 ते 70 महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत लाटे (वय 30, रा. वडारवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता हा प्रकार घडला होता. तपास करून आणखी कलम वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. तर बचाव पक्षातर्फे सर्व गुन्हे जामिनपात्र असल्याचे ऍड. सतीश मुळीक यांनी न्यायालयात सांगितले.
सोमय्या महापालिकेत निघाले होते. त्यांना जाण्यापासून रोखले. यावेळी एका कार्यकर्त्याने सोमय्या यांना धक्काबुक्की केली आणि पायरीवरून खाली पाडले. त्यामध्ये त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांची मोटार आडवून त्यावर हात तसेच चप्पलने मारले तसेच हातात विटा घेवून जीवितास धोका पोहचविण्याच्या उद्देशाने थांबले होते असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी गुन्हा दाखल झालेले कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाले होते.