यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड इथले आमदार नामदेव ससाणे यांच्यासह अन्य 11 जणांविरुद्ध केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनामध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वानी स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट लावण्याच्या कामात गैरव्यवहार केल्याची तक्रार एका तत्कालीन नगरसेवकाने केली होती. त्या तक्रारीवरून तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता.
मात्र, त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे तक्रारदाराने उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत न्यायलयाने नगर विकास मंत्रालयाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाने या आरोपींविरोधात 65 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.