मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीविरोधातील दाखल केलेल्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत भाजप नेते गिरीष महाजन यांना फटकारले. तसेच याप्रकरणी जनहित याचिका दाखलच होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्यांनी नियमांचे अयोग्य वाचन केले असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे. तर महाजन यांनी भरलेले 10 लाख, तर व्यास यांनी भरलेली 2 लाखांची अनामत रक्कम देखील कोर्टाकडून जप्त करण्यात आली आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मताने घेण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली. मात्र, या निवडणूक प्रक्रियेला भाजपने विरोध केला. या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी जनहित याचिका भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने गिरीश महाजन यांना फटकारले आहे.
विधान परिषदेच्या नामनिर्देशित 12 आमदारांच्या निवडीवर मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही दोन प्रमुख घटनात्मक पद एकमेकांच्या सोबत नाहीत हे राज्याचं दुर्दैव आहे. मात्र या वादातून नुकसान मात्र सर्वसामान्य जनतेचे होत आहे. विधानपरिषदेवरील 12 नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीवरून राज्यपालांनी हायकोर्टाच्या मतांचा मान राखायला हवा होता. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आम्हाला पटतच नाही. या प्रकरणात जनहित याचिका कशी दाखल होऊ शकते, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
तसेच विधानसभेच्या अध्यक्षांबाबत लोकांना पडलेली आहे का? इथे बसलेल्या कितीजणांना लोकसभेचा अध्यक्ष कोण आहे हे माहित आहे? विधानसभा अध्यक्ष कोण असावा याने जनतेच्या हिताचे कसे उल्लंघन होते? अशी प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने केली. तसेच अशा याचिका करून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, अशा शब्दांत फटकारले.
…हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का?
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमबदलाने लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असे महाजनांचे म्हणणे आहे. असं असेल तर राज्यपालांनी 12 नामनिर्देशित सदस्यांची अद्याप निवड केलेली नाही, मग हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का? असा प्रश्न न्यायालयाने गिरीश महाजनांना विचारला. तसेच विधान परिषदेच्या नामनिर्देशित 12 सदस्यांच्या निवडीबाबतचा आदेश देऊन आठ महिने उलटले आहेत. पण या आदेशाचाही आदर राखला गेलेला नाही, अशी टिप्पणी कोर्टाने राज्यपालांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत केली.