शिवदुर्ग मित्रचे सचिव सुनील गायकवाड यांचा 90 सदस्यांसह भाजप प्रवेश
लोणावळा – भाजपात प्रत्येक कार्यकर्त्याला मान-सन्मान मिळतो. भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या कामाला महत्व देण्यात येते. भाजप हा नि:स्वार्थी सेवाभावी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी येथे केले.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे भाजप जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 3) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शिवदुर्ग मित्र या सामाजिक संघटनेचे सचिव सुनील गायकवाड व संघटनेच्या 90 सदस्यांनी तसेच शहरातील प्रसिद्ध वास्तुविशारद विरेंद्र पारख यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, भाजपा लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर व दादा सातव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गणेश धानिवले, महिलाध्यक्षा योगीता कोकरे, नगरसेवक देविदास कडू, बिंदा गणात्रा, मंदा सोनवणे, रचना सिनकर, विशाल पाडाळे, रवींद्र माने, बाळासाहेब जाधव, राजाभाऊ खळदकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळा भेगडे म्हणाले की, सुनील गायकवाड यांच्या प्रवेशाने मावळात विरोधकांना पहिला धक्का बसला असून, आता मावळातील 57 ग्रामपंचायतीवर विजय मिळवायचा आहे. याशिवाय 2021 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील किमान 10 नगरपरिषदा भाजपाच्या ताब्यात असतील असेही भेगडे यांनी सांगितले.
प्रास्ताविक शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते अरुण कुलकर्णी यांनी केले. रुपेश नांदवटे यांनी आभार मानले.