नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने देशाला माफिया प्रजासत्ताक बनवले आहे, अशी टीका तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या, खासदार महुआ मोईत्रा यांनी केली आहे. अतिक अहमद आणि त्याच्या भावाची काही गुंडांनी काल उत्तर प्रदेशात हत्या केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, भाजपने भारताला माफिया प्रजासत्ताक बनवले आहे. मी हे येथे म्हणेन, मी ते परदेशातही म्हणेन, मी ते सर्वत्र म्हणेन, कारण हे सत्य आहे. कोठडीत असलेल्या दोन व्यक्तींना पोलीस आणि कॅमेऱ्यांसमोर गोळ्या घालून ठार केले जाते. ही घटना कायद्याच्या राज्याचा मृत्यू आहे, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या घटनेला कोल्ड ब्लडेड मर्डर म्हटले आहे. या हत्येचा आनंद साजरा करणारे लोक गिधाडे आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. रविवारी सकाळी पत्रकारांना संबोधित करताना ओवेसी म्हणाले, “भाजप सरकारची यात भूमिका आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीत उत्तर प्रदेशातील कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश असता कामा नये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.