खासदार माने यांनीच सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार धैर्यशील माने यांच्या सासऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खासदार माने कुटुंबियांसह १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाले आहेत. खासदार माने यांनीच सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
खासदार माने यांनी ट्वीट करुन माझे सासरे, त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी त्यांचा अहवाल आला असून ते कोरोना बाधित आहेत. त्यांच्याशी संपर्क आल्यामुळे खबरदारी म्हणून मी माझ्या कुटुंबियांसमवेत पुढील १४ दिवस क्वारेंटाईन होत आहे.
गरजेच्या वेळी मी व माझे सहकारी आपल्या सेवेसाठी फोनवरून उपलब्ध आहोत. कोणतीही मदत लागल्यास नागरिकांनी फोनवरून संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. तसेच गेल्या चार दिवसांत जे सासऱ्यांच्या आणि माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी खबरदारी म्हणून लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान कोणतीही मदत लागल्यास नागरिकांनी फोनवरून संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.