नवी दिल्ली – भाजपचे राज्यसभेचे उमेदवार चुन्नीलाल गरसिया यांचे प्रतिनिधी व भाजप नेते योगेंद्र सिंह तन्वर यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून सोनिया गांधी यांच्या राज्यसभेच्या अर्जाला आक्षेप घेतला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दाखल केलेल्या फॉर्म २६ मध्ये स्थावर मालमत्तेची माहिती अपुर्ण असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सोनिया गांधी यांनी राज्यसभेसाठी बुधवारी आपला अर्ज दाखल केला आहे.
वर नमूद केलेल्या फॉर्म २६ च्या पॅरा ७ बी मध्ये, स्थावर मालमत्तेचा तपशील देणाऱ्या कलमांतर्गत, सोनिया गांधी यांनी इटलीमधील वारशाने मिळालेल्या मालमत्तेतील शेअरची मालकी नमूद केली आहे. तथापि, मालमत्तेचे विशिष्ट स्थान, किंवा ती मालमत्ता इटालीतील नेमक्या कोणत्या गावात आहे नमूद करण्यात आलेले नाही.
तसेच मालमत्तेतील टक्केवारीचा वाटाही स्पष्ट करण्यात आलेला नाही. त्याऐवजी, त्या स्तंभात “लागू नाही” असे नमूद केले आहे,त्यामुळे त्यांनी ही माहिती लपवली आहे असे अर्जदाराचे म्हणणे आहे.त्यामुळे त्यांचा अर्ज नाकारला जावा अशी मागणी अर्जदाराने केली आहे.