BJP Candidate list । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यासाठी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केलेल्या यादीत एकूण ३४ मंत्र्यांना स्थान देण्यात आलंय. भाजपाने पहिल्या यादीत २८ महिला उमेदवारांची नावंदेखील जाहीर केलीत. दरम्यान, या यादीत भाजपने दिग्गजांना पूर्णपणे डावललं असल्याचे दिसतंय.
भाजपाने दिल्लीतल्या लोकसभेच्या सातपैकी पाच जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केलेत. प्रवीण खंडेलवाल यांना चांदणी चौकातून, मनोज तिवारींना उत्तर-पूर्व दिल्लीतून, बांसुरी स्वराज यांना मध्य दिल्ली, कमलकित सहरावत यांना पश्चिम दिल्ली आणि रामवीर बिधुडी यांना दक्षिण दिल्लीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. भाजपाने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी बांसुरी स्वराज यांना संधी दिलीय.
दरम्यान, भाजपाने यंदाच्या निवडणुकीत भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही पत्ता कट केलाय. भाजपाने प्रज्ञा ठाकूर यांच्याऐवजी आलोक शर्मा यांना भोपाळमधून उमेदवारी दिलीय. नरेंद्र मोदी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर नाराज असल्याने त्यांचं तिकीट यावेळी कापण्यात आल्याची चर्चा समोर आलीय.
पंतप्रधान मोदी प्रज्ञा ठाकूरांवर नाराज? BJP Candidate list ।
भाजपाने २०१९ मध्ये संरक्षणविषयक २१ सदस्यीय सल्लागार समिती नेमली होती. या समितीत प्रज्ञा ठाकूर यांचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, ठाकूर यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांची या समितीतून हकालपट्टी करण्यात आली होती. प्रज्ञा ठाकूर यांनी संसद भवनामध्ये नथुराम गोडसे याला राष्ट्रभक्त घोषित केलं होतं. त्यानंतर ठाकूर यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे पक्षश्रेष्ठी ठाकूर यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रातला नेता यूपीच्या मैदानात BJP Candidate list ।
दरम्यान, भाजपाने पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तिसऱ्यांदा लोकसभा लढवणार आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील उमेदवारांच्या यादीतलं एक नाव पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह यांनादेखील लोकभेची उमेदवारी देण्यात आली आहे. कृपाशंकर सिंह उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत.