प्रत्येक मिनिटाला 95 बिर्याणी होतात घरपोहोच?
नवी दिल्ली : भारतीयांच्या आहारांच्या सवयींविषयी घरपोहोच अन्न पोहोचवणाऱ्या एका संस्थेने आपला वर्ष 2019 चा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार सर्वाधिक ग्राहकांच्या पसंतीचा मान अर्थातच बिर्याणीला मिळाला असून, नाष्टयासाठी मसाला डोसा, दुपारच्या भोजनासाठी चिकन बिर्याणी आणि रात्रीच्या भोजनासाठी बटर नान विथ पनीर बटर मसाला या डिशेसना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. खाण्या-जेवण्यामध्ये शॉर्टकट मारणाऱ्यांमध्ये डाल-खिचडीने बाजी मारली असून स्वीट डिशेसमध्ये आजही गुलाबजाम सर्वोच्च क्रमांकावर आहे तर फ्युजन फूडमध्ये पिझ्झावर पायनॅपल टॉपिंगची क्रेझ आहे.
आजकाल बहुतांश भारतीय घरांमध्ये किचनमध्ये दररोज सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक करण्याची परंपरा हळूहळू लोप पावत असून हॉटेलिंगला जाणे किंवा घरपोहोच/ऑफिसपोहोच अन्न मागवणे या सवयी मेट्रो तसेच मोठ्या शहरांमधील खवय्यांना लागल्या आहेत. त्यामुळे घरपोहोच अन्न पोहोचवणाऱ्या कंपन्यांचा व्याप तर वाढतच आहे, शिवाय डिलीव्हरी बॉईजच्या रुपाने मोठी रोजगारनिर्मितीही होत आहे.
वाढदिवसांसाठी मागवल्या जाणाऱ्या केकच्या डिलिव्हरीजमध्येही कमालीची वाढ झालेली आहे. अनेकदा जेथे वाढदिवसाची पार्टी आहे, अशा ठिकाणी केक डिलिव्हर करावे लागतात. त्यामध्ये अगदी समुद्रातला लॉन्चेस, बोटीपासून, एखाद्या किल्ल्याच्या बुरुजापर्यंतच्या ठिकाणांचा समावेश असतो. अशा सर्व प्रकारच्या केक्समध्ये ब्लॅक फॉरेस्ट हा केक सर्वाधिक पसंतीचा असल्याचे दिसून आले आहे. दिल्ली, बेंगळुरु, मुंबई असो की चेन्नई-हैदराबाद, सर्वत्र भोजनाच्या वेगवेगळ्या रुची असल्या तरिही सर्वांना आवडणारी स्वीट डिश म्हणजे गुलाबजामच ठरली आहे. त्याखालोखाल खवय्यांनी मूगडाळ हलव्याला पसंती दिली आहे. तर काल्ड्रिंक्समध्ये फालूदा आणि चोको-पाय ड्रिंकची सध्या चलती आहे.
आजारी नागरिकांसाठी सर्वाधिक ऑर्डर करण्यात आलेले फळ आहे पपई, जी डेंग्युच्या उपचाराचा एक भाग आहे. तर अनेक नागरिकांना पथ्यपाणी असलेला आहारही पुरवण्यात अनेक कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. त्यात सर्वाधिक मागणी शुगर-फ्रीसाठी असून त्याखालोखाल दुधी भोपळ्याच्या डिशेसचा क्रमांक लागतो. काही अवाजवी मागण्यांमध्ये लंगर अथवा मंदिरातील प्रसाद तर काही ग्राहकांनी गोमूत्रही ऑनलाईन ऑर्डर केल्याचे दिसून आले आहे.
बिर्याणीचे आवडते प्रकार
1. बोनलेस चिकन बिर्याणी
2. चिकन दम बिर्याणी
3. मटण दम बिर्याणी
4. पुणेरी स्पेशल तुपातली चिकन बिर्याणी
5. अंडा बिर्याणी
6. व्हेज बिर्याणी/पनीर व्हेज बिर्याणी