गृहिणींचा घरगुती पद्धतीने पदार्थ तयार करून विक्रीवर भर
पुणे – व्हॉटस्अपवर फराळाच्या जाहिरातींचा अक्षरश: “फराळ’ सुरू असून अनेकांनी लॉकडाऊनच्या काळात या घरगुती बिझनेसचा विचार केला असणार हे यावरून दिसून येते. त्यामुळेच व्हॉटस्अपवर भारंभार जाहिराती सध्या दिसू लागल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या परिस्थितीत अनेकजण चाचपडत उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून दिवाळी आल्याने बहुतांश गृहिणींनी संसाराला हातभार लावण्यासाठी फराळाचा गृहउद्योगाप्रमाणे आधार घेतला आहे. अनेक जण व्हॉटस्अपवर ग्रुपवर या संदर्भातील मेसेज टाकत आहेत. फराळाचे दर, त्याच्या चवीबाबतची खात्री दिली जात आहे. नातेवाईकांनीही आपापल्या ओळखीच्या लोकांच्या जाहिराती ग्रुप्समध्ये “पेरायला’ सुरूवात केली आहे.
लाडूचे प्रकार, चकली, चिवड्यांचे प्रकार, शंकरपाळ्यांचे प्रकार, कडबोळी, करंज्यांचे प्रकार (ओल्या नारळाचे वगैरे), शेव, सोनपापडी, चिरोटे, बाकरवडी यासह अनेक प्रकार या “ऑफर्स’मध्ये दिसून येत आहेत. आपली जाहिरात अधिक आकर्षक कशी होईल, याकडेही अनेकांनी लक्ष दिले आहे. याशिवाय ज्यांना परदेशात फराळ पाठवायचा आहे, त्यांच्यासाठी खास पॅकींगची व्यवस्था असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे. “मेड फॉर ऑर्डर’ असेल तर त्यासाठी खास सवलतही दिली जात आहे.
लॉकडाऊनमुळे खाद्यपदार्थांच्या ऑर्डर मिळत नव्हत्या. संपूर्ण सिझनच फ्लॉप गेला आहे. त्यामुळे निदान दिवाळीची संधी मिळाली आहे. त्यातून खाद्यपदार्थांना मागणी वाढली आहे. यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. त्यादृष्टीने व्हॉटस्अपवर सारख्या सोशल मीडियाचा आधार घेत आहे.
– सुजाता दिवेकर, गृहव्यावसायिक