– प्रा. सागर कुलकर्णी
आज 12 नोव्हेंबर म्हणजे भारतीय पक्षीशास्त्राचे अध्वर्यु डॉ.सलीम अली यांचा जन्म दिवस. त्याला अनुसरून आजचा राष्ट्रीय पक्षी दिवस असल्याचे निमित्त साधून सातारा परिसरातील पक्षीवैभवाची ही अल्पशी ओळख…
महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा घाटमाथ्यावरील सुजलाम सुफलाम प्रदेश. महाबळेश्वर, पाचगणी , कास पुष्प पठार आणि ठोसेघरचा निसर्गरम्य आणि अनेक प्रजातींचा रहिवास येथे आढळतो. साताऱ्यातील पक्षी वैभव तर अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांनी नटलेले आहेच तसेच तसेच परदेशी पाहुण्यांचे अर्थात स्थलांतरीत पक्ष्यांचे होणारे साताऱ्यातील आगमन हा देखील औत्सुक्याचा विषय आहे.
साताऱ्यात आढळणाऱ्या शिकारी पक्ष्यांमध्ये तुरेवाला सापमार गरुड ,आखूड पायाचा सापमार गरुड हे डोंगरातील मोठे साप खाणारे शिकारी पक्षी, ठिपकेवला गरुड,बोनेलिस गरुड, क्रेस्टेड हॉक गरूड हे विरळ जंगलात शिकर करणारे पक्षी आणि परदेशातील युरोप येथील स्टेपी या बर्फाळ परदेशातून यणाऱ्या अवाढव्य स्टेपी गरुड यांचा समावेश आहे. अनेक गरुडांचा निवास साताऱ्यात आढळतो. घुबड हा रात्री शिकार करणारा पक्षीही सातारा परिसरात मुबलक आढळतो. यातील अत्यंत दुर्मिळ शृंगी घुबड अनेक दगडाच्या खाणींमध्ये राहते. नदीवरील मासेमार घुबड हे कृष्णा, उरमोडी, कोयना या नद्यांवर आढळते. पट्टेरी वन धुबड अनेक सागवानाच्या जंगलात सापडते आणि रात्री त्याच्या घुतकारने जंगल हादरून निघते. दिमाखदार ठिपकेदार पिंगळा शहरातील मंदिरांमध्ये असणाऱ्या मोठ्या झाडांवर राहते.
वेण्णा नदीवरील कण्हेर धरण, उरमोडी धरण, कुमठे तलाव, या पणवठ्यांवर शेकाट्या, तुतारी, चक्रवाक, ठिपकेदार बदक, चमचा-चोच्या, लोकरी मानेचा करकोचा हे पक्षी थंडीच्या दिवसात गर्दी करतात. तसेच ऑस्प्रे आणि भोवत्या सारखे शिकारी पक्षीही दिसतात. साताऱ्यात स्थलांतर करणारे पांढुरखा भोवत्या, देवसासणा, युरोपिअन नीलकंठ हे दुर्मिळ पक्षी साताऱ्यात खास पाहुणचार घ्यायला येतात.
डोंगराळ भागात आढळणारे गडद लाल रंगातील निखार, पिवळ्या रंगाचा हळद्या, सुंदर लांब शेपटी घेऊन नृत्य करणारा स्वर्गीय नर्तक आणि आपल्या सुरेख शिळे ने पक्षी प्रेमींना साद घालणारा निळा थ्रश हे आणि असे अनेक पक्षी वैभव हे साताऱ्याची शान आहे. तसेच या सर्व पक्ष्यांचे आपण संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडांची लागवड करून त्यांना आवास निर्माण करून द्यायची आवश्यकता आहे. तसेच साताऱ्यातील पक्षी हा अत्यंत खोल संशोधनाचा विषय आहे त्यावरही काम होणे आवश्यक आहे.