पुणे – स्थलांतरित पक्ष्यांच्या भ्रमण मार्गाचा मागोवा घेण्यासाठी जीपीएस, “जीएसएम’ टॅगचा वापर करण्याबाबत पक्षी अभ्यासक संघटनांकडून सातत्याने विचारणा केली जात होती. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारकडून या यंत्रणांच्या वापरासाठी परवानगी नाकारण्यात येत होती. मात्र, नुकतेच केंद्र सरकारने या यंत्रणाच्या अभ्यासाठी परवानगी दिली असून, स्थलांतरित पक्ष्यांच्या भ्रमणमार्गाच्या अभ्यासासाठी आता “जीपीएस’, “जीएसएम’ यंत्रणा वापरली जाणार आहे.
“सेंट्रल एशियन फ्लायवे’ या पक्षी स्थलांतराच्या महत्त्वाच्या आकाशमार्गामध्ये भारताचा समावेश होतो. या आकाशमार्गावरून उत्तर आशियातील बहुतांश पक्षी हिवाळ्यात भारतात स्थलांतर करतात. “बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’कडून (बीएनएचएस)कडून या स्थलांतराचा शास्त्रीय अभ्यास गेल्या सहा ते सात दशकांपासून सुरू आहे. आतापर्यंत हा अभ्यास “रिंग’ आणि “कलर फ्लॅग’ या पद्धतीच्या माध्यमातून केला जात होता. यामध्ये पक्ष्यांच्या पायाला सांकेतिक क्रमांक असलेली रिंग आणि विशिष्ट रंगाचा फ्लॅग लावण्यात येतो. मात्र, या माध्यमातून पक्ष्यांच्या प्रवासाची नेमकी माहिती मिळण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे या पद्धतीचा वापर करण्याबरोबरच पक्ष्यांना जीपीएस आणि जीएसएम टॅगही लावण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती.
परदेशातून मागवलेली जीपीएस, जीएसएम उपकरणे भारतात दाखल
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव “टेलिमेट्रिक’ पद्धतीने पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यास परवानगी देत नव्हते. आता सरकारकडून यासाठी परवानगी मिळाल्याने “बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’कडून पक्ष्यांना जीपीएस आणि जीएसएम टॅग लावण्यात येणार आहेत.परदेशातून मागवलेली जीपीएस आणि जीएसएम उपकरणे भारतात दाखल झाली असून महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक टप्प्यामध्ये पक्ष्यांना ही उपकरणे लावणार असून त्यामध्ये फ्लेमिंगो (छोटा आणि मोठा), मोठा करवानक आणि कुदळ्या पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी दिली.