पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर आणि राष्ट्रीय जनता दलाशी घरोबा केल्यानंतर बिहारचे वातावरण तापलेलेच आहे. त्यातून राजद आणि संयुक्त जनता दल एकीकडे तर भारतीय जनता पार्टी एकीकडे असे रोज आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता राजदच्या मुख्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या एका पोस्टरने गरम कढईत तेल शिंपडण्याचे काम केले आहे.
संबंधित पोस्टरमध्ये राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवाच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. अन्य पक्षांचे नेते आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही विविध देवतांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह तर साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या अवतारात आहेत.
ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या रथाचे सारथ्य करत आहेत. त्यामुळे नितीश अर्थातच महाभारतातील पार्थ अर्थात अर्जुनाच्या अवतारात दिसत आहेत. आता हस्तिनापूरवरच चढाई अर्थात दिल्लीकडे प्रयाण असे पोस्टरवर लिहण्यात आले आहे. 2024 ची मोहीम आहे त्या दिशेने पुढे जा पार्थ असेही हातात कंदील घेतलेले तेजस्वी नितीश यांना सांगत असल्याचे त्यातून प्रतीत होते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची छायाचित्रे पोस्टरवर आहेत. त्यात मोदींच्या फोटोखाली कोणाचे काहीच न ऐकणारे आणि केवळ आपल्याच मनाचे सांगणारे अहंकाराचे प्रतिक असे लिहीण्यात आले आहे. तर शहांच्या फोटोखाली मानवाला मानवाशीच लढण्यास उद्युक्त करणारा अधर्माचा प्रतिक असे म्हटले आहे.
भाजपची टीका –
राष्ट्रीय जनता दलाच्या या पोस्टरमुळे भाजपच्या गोटात खळबळ आहे. पोस्टरला उत्तर देताना भाजपचे विजय सिन्हा यांनी कवि दिनकर यांच्या ओळींची मदत घेतली आहे. मनुष्याचा जेव्हा विनाश अटळ असतो तेव्हा सगळ्यांत प्रथम त्याचा विवेक संपतो असे त्यातून सूचित होते आहे. कौरवांच्या सेनेप्रमाणे नितीशही आपली सेना पुढे नेण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र आमची नारायणी सेना राष्ट्रवाद आणि सत्य पुढे घेऊन जाते आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असे सिन्हा यांनी म्हटले आहे. कोणी भ्रष्टाचार लपवण्यासाठी तर कोणी महत्वाकांक्षा उराशी बाळगून तर कोणी संपत्ती मिळवण्यासाठी असे विरोधक एका व्यासपीठावर गोळा झाले आहेत असा आरोप त्यांनी केला.