पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षाचे (जेडीयू) नेतृत्व करण्याची ऑफर मला दिली. पण, ती मी नाकारली, असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी केला.
किशोर सध्या बिहारव्यापी पदयात्रेवर आहेत. त्यावेळी एका ठिकाणी बोलताना किशोर यांनी दोन आठवड्यांपूर्वी नितीश यांच्या निमंत्रणावरून झालेल्या भेटीविषयीचा गौप्यस्फोट केला. नितीश यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांनी पुन्हा त्यांच्याशी हातमिळवणी करणार नसल्याचेही सूचित केले.
जेडीयूची 2014 मधील लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झाल्यानंतर नितीश यांनी माझ्याकडे मदतीची याचना केली. त्यामुळे 2015 मधील विधानसभा निवडणुकीत मी त्यांना मदत केली. त्या निवडणुकीत महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नितीश यांना यश मिळाले. मात्र, आज ते मलाच शिकवण्याचे साहस दाखवत आहेत, अशी खिल्ली किशोर यांनी उडवली.
किशोर यांनी 2018 या वर्षी जेडीयूमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही आठवड्यांतच त्यांना त्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. मात्र, काही मुद्द्यांवरून नितीश यांच्याशी मतभेद झाल्याने किशोर यांची प्रवेशानंतर दोन वर्षांच्या आत जेडीयूमधून हकालपट्टी करण्यात आली.