मुंबई – ‘बिग बॉस मराठी’ मध्ये झळकलेला अभिनेता आदिश वैद्यला (Adish Vaidya) लॉटरी लागली आहे. लवकरच आदिश बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Siddharth Malhotra) स्क्रीन शेअर करणार आहे. मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकलेला आदिश लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिका साकारणार आहे. तर आदिश देखील सिद्धार्थसोबत पाहायला मिळणार आहे.
या सीरिजचे नाव ‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force)असे आहे. रोहित शेट्टी आणि सुशवंत प्रकाश दिग्दर्शित या सीरिजमध्ये आदिशची वर्णी लागली आहे. आदिशने सोशल मीडियाद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे आदिशचे चाहते देखील त्याला सिद्धार्थसोबत एकत्र पाहण्यास उत्सुक आहे. आदिशने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “बॉलिवूडच्या या स्टारबॉयसोबत काम करायची संधी मिळाली त्यामुळे फार आनंदात आहे. एका महत्त्वाच्या सीननंतर आम्ही हा फोटो काढला,” असे कॅप्शन त्याने फोटोला दिले आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी आदिशने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला होता. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. पुढील वर्षी प्राइम व्हिडीओ (Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘इंडियन पोलीस फोर्स’ रिलीज होणार आहे.
दरम्यान, रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. यातच आता मराठमोळा अभिनेता आदिश वैद्य देखील या सिरिजमध्ये झळकणार असल्याने याची उत्सुकता अधिक वाढली आहे.