‘त्यांना’ देखील माहिती आहे महाराष्ट्राचा खरा ‘बिग बॉस’ कोण?

मुंबई – आपल्या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या रिऍलिटी शो-मधील स्पर्धकाने मराठी भाषेबद्दल गरळ ओकल्याबाबत अखेर कलर्स वाहिनीने माफीनामा सादर केला आहे. बिग-बॉस या रिऍलिटी शो-मधील जान कुमार नामक एका स्पर्धकाने मराठी भाषेचा अवमान करताना, ‘मला मराठी भाषेची चीड येते’ असं संतापजनक वक्तव्य केलं होत.

जान कुमारच्या या वक्तव्यानंतर मराठी भाषिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच मनसे व शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली होती. मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्याबाबत या वाहिनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपला माफीनामा सादर केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलर्स वाहिनीने मनसेला शुद्ध मराठीतील माफीनामा सादर केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत आणि राज ठाकरेंना मराठीत माफीनामा सादर केल्यामुळे राज्यात नवीन राजकारण रंगले आहे. याच पार्श्ववभूमीवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करुन आपले मत व्यक्त केले आहे. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’ कलर्स वाल्यांना पण माहिती आहे खरं सरकार कुठे आहे…अभिमान आहे तुमचा”. या आशयाचे ट्विट खोपकर यांनी केले आहे.

सध्या सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांकडून पोस्टर बाजी देखील सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पोस्टरमध्ये लिहिलेल्या वाक्यांवरुन मनसे आणि शिवसेनेमध्ये राजकीय वाद उफाळू शकतो हे नक्कीच.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.