नवी दिल्ली – भारतात महागाई वाढलेली नाही. जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकन रिझर्व्ह बॅंक व्याजदरात दीर्घकाळ वाढ करण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बॅंक पुढील महिन्यात होणाऱ्या पतधोरणात व्याजदरात वाढ किंवा घट करण्याची शक्यता कमी आहे असे मत स्टेट बॅंकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी व्यक्त केले.
पतधोरण समिती महागाई महागाईच्या आकडेवारीसह इतर आकडेवारीचा विचार करत असते. सर्वात जास्त लक्ष महागाईच्या आकडेवारीवर असते. काही महिन्यापासून महागाई फारशी वाढत नसल्याचे दिसून येत आहे. एक बॅंक म्हणून व्याजदरात कपात होणार नाही असे आम्हाला वाटते. त्याचबरोबर व्याजदात वाढ करण्याचीही गरज भासणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
पतधारण समतिीची बैठक आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान होणार आहे. अगोदर झालेल्या दोन पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ किंवा घट केलेली नाही. सध्या रिझर्व्ह बॅंकेचा मुख्य व्याजदर म्हणजे रेपो दर 6.5% इतका आहे. यापेक्षा व्याजदरात वाढ करण्यास रिझर्व्ह बॅंकेला वाव नाही असेही समजले जात आहे.
खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत बोलताना खारा यांनी सांगितले की खासगी क्षेत्राकडून कर्जाची मागणी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातूनही मागणी वाढत आहे. त्यामुळे कर्जाची मागणी वाढत आहे. मागणी वाढत असल्यामुळे कंपन्याकडून विस्तारीकरणासाठी भांडवलाचा वापर वाढण्याची जास्त शक्यता आहे.
विकास दर वाढत असताना सर्वच क्षेत्राकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वसमावेशक विकासासाठी सरकार प्रयत्न करत आहे. बॅंकांही आपल्या परीने मध्यमवर्गीय आणि गरिबांना भांडवल सुलभ पद्धतीने देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर जनधन योजना, विमा योजनासारख्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.