मुंबई – उद्योजकांच्या संघटनांनी व्याजदरात जास्त वाढ करू नये असे आवाहन केले असताना रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसाची बैठक सोमवारी सुरू झाली. सात तारखेला म्हणजे बुधवारी रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. अमेरिकेतील रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात जास्त वाढ न करण्याची शक्यता सुचित केली आहे.
त्यामुळे रिझर्व्ह बॅंक यावेळी व्याजदरात 0.50% ऐवजी 0.25 ते 0.35% ची वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. बॅंकेने या अगोदर तीन वेळा 0.50% ची व्याजदर वाढ केली आहे तर एक वेळा 0.40% ची व्याजदर वाढ केली. मे महिन्यापासून रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात 1.90 टक्क्यांची वाढ केली आहे.
त्यामुळे महागाई काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र अजूनही महागाईचा दर 6% पेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बॅंकेने महागाईचा दर 6% च्या आत रोखावा अशी सूचना अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बॅंकेला केली आहे. अशा परिस्थितीत व्याजदरात 0.35% पर्यंत वाढ केली तरीही महागाई 6% च्या खाली जाण्याची शक्यता बऱ्याच विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
जर व्याजदरात आणखी जास्त वाढ केली तर त्याचा कंपन्या आणि नागरिकांच्या भांडवल वापरावर परिणाम होऊ शकतो असे समजले जात आहे. जर रिझर्व्ह बॅंकेने आता 0.35 टक्क्यांची व्याजदर वाढ केली तर रिझर्व्ह बॅंकेचा रेपो दर सव्वा सहा टक्के होणार आहे. त्यानंतर रिझर्व्ह बॅंक व्याजदरात फारसी वाढ करण्याची शक्यता कमी असल्याचे समजले जाते.
ऑक्टोबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर कमी होऊन 6.77% इतका झाला आहे. तर दुसऱ्या तिमाहित विकासदर कमी होऊन 6.3% झाला आहे. आता जर पुन्हा व्याजदरात जास्त वाढ केली तर विकासदरावर आणखी नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे रोजगार निर्मितीवर परिणाम होईल. अशा परिस्थितीत व्याजदरात जास्त वाढ टाळावी असे बऱ्याच उद्योजकांच्या संघटनांनी सरकारला सांगितले आहे.