अहमदनगर – लाचखोरीची प्रकरणे कमी न होता ती वाढतच चाललेली दिसत आहे. याआधी पाच हजार, पन्नास हजार, 10 लाख अशी लाचेची प्रकरणे समोर येत असत मात्र आता तब्बल एक कोटी रुपये लाचेचे प्रकरण उघडकीस आले आहे. अहमदनगर एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गायकवाड यास अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास जवळ शुक्रवारी रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या पैशांची हेराफेरी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण ?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाईबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाच्या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउट वर्डवर घेऊन तत्कालीन अभियंताचे स्वाक्षरी घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान नाशिक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने सहाय्यक अभियंता गायकवाडला एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.
या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50 टक्के वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड याने दिली आहे.
बिल 2 कोटी 66 लाख, लाचेची मागणी 1 कोटी –
अहमदनगर येथील एमआयडीसी अंतर्गत 100 mm व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे, म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत शासकीय ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली.