मुंबई – राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गाळप हंगाम 2021-22 मध्ये राज्यात एकूण 13.67 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. सन 2020-21 मध्ये 11.42 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. तसेच 16 मे 2022 अखेर 100 सहकारी व 99 खासगी असे 199 साखर कारखान्यांकडून 1300.62 लाख टन ऊस गाळप झालेले आहे. मागील वर्षापेक्षा सुमारे 55,920 टन प्रतीदिन जास्त गाळप क्षमतेने गाळप होत आहे. मागील वर्षी याच दिनांकास 1013.31 लाख टन गाळप झालेले होते. चालू वर्षी 287.31 लाख टन गाळप जास्त झालेले आहे. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.