न्यूयॉर्क: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती केल्यानंतर आता अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, “त्यांच्यावर कोणतं संकट येऊ घातलेलं आहे, याची त्यांना कल्पनाही नाही”,अशा शब्दांत जो बायडेन यांनी आपली भूमिका मांडली आहे.
रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी किव्हला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. किव्हमधील अनेक इमारतींवर रॉकेट्सने हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी युरोपियन संसदेसमोर केलेल्या भाषणात जगासमोर मदतीची विनंती केली आहे. “आम्ही मजबूत आहोत. आम्ही स्वातंत्र्यासाठी, जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तुम्ही सिद्ध करा की आम्हाला एकटं सोडणार नाही”, असे आवाहन त्यांनी युरोपियन संसदेसमोर केले आहे. त्यांच्या भाषणावर संसदेमध्ये स्टँडिंग ओवेशनने दाद देण्यात आली.
#BREAKING Biden says US will “never just accept living with Covid,” as he tries to rally weary Americans facing their third year of the pandemic.
“Thanks to the progress we have made this past year, Covid-19 need no longer control our lives… but… we have to stay on guard” pic.twitter.com/5zBezGZsbd
— AFP News Agency (@AFP) March 2, 2022
युरोपियन संसदेने युक्रेनला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता अमेरिकेने देखील रशियाला गंभीर इशारा दिला आहे. स्टेट ऑफ युनियनसमोर स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री उशीरा जो बायडेन यांनी केलेल्या भाषणात अमेरिकेची नेमकी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. “रशियाने पुकारलेल्या या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि नाटो देश युक्रेनच्या एक-एक इंच जमिनीचं रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. पुतिन हे हुकुमशहा असून ही लढाई हुकुमशहा विरुद्ध स्वातंत्र्य अशी आहे”, असे बायडेन म्हणाले.
यावेळी रशियाला आवर घालण्यासाठी अमेरिकेने मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. “त्यांच्यासमोर आता मोठं संकट उभं राहणार आहे. त्यांना अजिबात कल्पना नाही की कोणतं संकट त्यांच्यावर येऊ घातलं आहे. आज मी ही घोषणा करतो की आम्ही आमच्या मित्र देशांसमवेत मिळून रशियाच्या कोणत्याही प्रकारच्या विमानांसाठी आमची हवाई हद्द पूर्णपणे बंद करतोय”, असे जो बायडेन म्हणाले.