अमेरिकेत 100 दिवस मास्क वापर सक्‍तीचा

देशात प्रवेश करण्यापूर्वी करोना चाचणी, विलगीकरण देखील अनिवार्य

वॉशिंग्टन – अमेरिकेत नवनियुक्‍त अध्यक्ष जो बायडेन यांनी करोनाविरोधी लढ्याचा भाग म्हणून युद्धपातळीवर अधिक कठोर उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. या उपाय योजनांमध्ये विदेशातून अमेरिकेत येणाऱ्या सर्वांनाच करोना चाचणी आणि विलगीकरण सक्‍तीचे करण्यात आले आहे.

साथ पूर्णपणे थांबवायला वेळ लागू शकतो. मात्र जर सर्व नागरिकांनी ऐक्‍य दाखवले तर अमेरिका हे साध्य करून दाखवेल, असा विश्‍वास बायडेन यांनी व्यक्‍त केला. अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यावर लगेचच करोना प्रतिबंधक कडक उपाय लागू करण्याची हमी बायडेन यांनी दिली होती.

आता अमेरिकेतील सर्वांना मास्कचा वापर सक्तीचा असेल. अन्य देशातून येणाऱ्या लोकांना येण्यापूर्वी करोना चाचणी अणि आल्यानंतर विलगीकरणही अनिवार्य असेल. बायडेन यांनी व्हाइट हाउसमध्ये आयोजित कार्यक्रमातच या संबंधीच्या आदेशांवर स्वाक्षरी केली.

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडून सहकार्य केले जात नव्हते. म्हणून अमेरिकेतील विमान कंपन्या आणि विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून या उपाय योजनांची मागणी करोनाची साथ सुरू झाली, तेंव्हापासूनच केली जात होती. मात्र पूर्वीच्या ट्रम्प प्रशासनाने या उपाय योजना लागू करण्यास नकार दिला होता. प्रशासनातील अनेक अधिकारी नेहमीच मास्कशिवाय हिंडताना दिसत असत.

ट्रम्प प्रशासनावर सर्वत्र सथीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता. बायडेन हे लवकरच देशपातळीवर लसीकरणाची मोहिमही सुरू करणार आहेत. प्रत्येक नागरिकाला लसीचे दोन डोस द्यायचे असल्याने अमेरिकेतील 5 कोटी जनतेला लस देण्यासाठी 10 कोटी डोसची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट बायडेन यांनी निश्‍चित केले आहे.

अमेरिकेत करोनाच्या साथीमुळे सर्वाधिक म्हणजे 4 लाख मृत्यू झाले आहेत. पुढच्या महिन्यापर्यंत मृत्यूचा आकडा 5 लाखापर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. तर 2 कोटी 45 लाख जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.