प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काँग्रेसमध्ये धुसपूस; यशोमती ठाकूर यांना हवेत थोरात

मुंबई – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना देखील काँग्रेस पक्षातील अध्यक्षपदासाठीची धुसफूस थांबण्याचं नाव घेत नसल्याचे चित्र आहे. तेच चित्र आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये दिसत आहे. प्रदेशाध्यक्षपदावरून पक्षात वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित असताना बाळासाहेब थोरात यांनीच अध्यक्षपदी राहावे, असा आग्रह सरकारमधील मंत्र्यांकडून सुरू करण्यात आला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात हेच राहायला हवेत, असं वक्तव्य महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

थोरात तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तिथेच तुम्ही राहिलं पाहिजे. तर आपण पुढच्या वेळेला सरकार बनविल्याशिवाय राहणार नाही. याचा मला विश्वास आहे. थोरातांनी महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली. थोरातांमुळे दोन महिलांना मंत्री होण्याची संधी मिळाली. कोणी तयार नसताना थोरातांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. तसेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्यात.

दरम्यान पुढील काळात काँग्रेसनं स्वबळावर लढून जास्त जागा जिंकल्या पाहिजेत. विधानसभा निवडणुकीत 12 ते 13 जागा काँग्रेसच्या निवडून येतील, असं बरेच जण बोलत होते. कोणी अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते, तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी धुरा सांभाळून यश आणल्याचे ठाकूर यांनी म्हटले.

नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित मानले जात आहे. असं असताना पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून मतभेद दिसून येत आहे. सध्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सुनील केदार, विजय वडेट्टीवार, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नावे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.