मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर आहेत अशी भावना निर्माण झाली असतानाच जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांक दीड टक्क्यांनी कोसळले.
काल सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 50 हजार अंकाच्या वर गेल्यानंतर नफेखोरी सुरू झाली होती. ही नफेखोरी आज दिवसभर चालू राहिली. बाजार बंद होताना सेन्सेक्स दिड टक्क्यानी म्हणजे 746 अंकांनी कोसळून 48,878 अंकावर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 218 अंकांनी कोसळून 14,371 अंकांवर बंद झाला.
आज धातू आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली. त्यामुळे निफ्टी बॅंक तीन टक्क्यांनी कमी झाला. मोठ्या कंपन्यांच्या शेअरबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे निफ्टी मिडकॅप 1.22 टक्क्यांनी व निफ्टी स्मॉल्कॅप 1.58 टक्क्यांनी कमी झाले.
निफ्टी ऑटो आणि निफ्टी आयटी वगळता इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. निफ्टीमधील ऍक्सिस बॅंक, एशियन पेंटस्, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बॅंक, हिंदाल्को या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर बजाज ऑटो हिरो मोटोकॉर्प, इशर मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
देशांतर्गत गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कालपासून कमी झाल्याचे काही विश्लेषकांनी सांगितले. गुरुवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 1,614 कोटी रुपयांच्या खरेदी केली. आजही हे गुंतवणूकदार बरेच सक्रिय होते असे वातावरण आहे.