ओतूर – बिबट्या सफारी प्रकल्पाचा मुद्दा गेली अनेक दिवस चर्चेत असताना जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि वनअधिकरींना घेऊन आंबेगव्हाण येथील जागेची रविवारी (दि. 17) सकाळी सहा वाजता पाहणी केली असल्याने आता बिबट सफारी प्रकल्पाबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे. येथील जागा या आधी देखील पाहणी केली असल्याने हा प्रकल्प आंबेगव्हाण येथेच होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्पासाठी रविवारी सकाळी सहा वाजता आणखी काही जागांची पाहणी वन अधिकाऱ्यांसमवेत आमदार बेनके यांनी केली. या आधी देखील तालुक्यातील काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन जागांची पाहणी केलेली आहे. बिबट सफारी प्रकल्पाच्या दृष्टीने जागा निश्चिती करण्यासाठी सकारात्मकतेने अधिकारी वर्गासमवेत काम करत असल्याचे
आमदार बेनके यांनी सांगितले. तर शासनही या प्रकल्पाबाबत सकारात्मक आहे, असे ते म्हणाले. यावर लवकरच निर्णय होणार आहे. याप्रसंगी वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, अजित शिंदे, अमित भिसे, वन विभागाचे आर्किटेक्ट अश्फाक अहमद (नागपूर), पर्यटन अभ्यासक शेखर नलावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.