भुलेश्वर – महाराष्ट्रात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या माळशिरस येथील श्री भुलेश्वर मंदिरात आज सूर्य नारायणाने मुख्य गाभार्यातील शिवलिंगासोबत मंदिरात 17 व्या शतकात जीर्णोद्धाराच्या वेळी पुण्याचे पेशवे व सातारचे छ.शाहू महाराज यांचे गुरु श्री ब्राम्हेंद्रस्वामी यांनी प्रदक्षिणा मार्गावर एक ओवरी मध्ये बसविलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर सूर्य किरणांचा अभिषेक घातल्याने हरी-हराला सूर्य किरणांचा अभिषेक हा एक भारतीय वास्तुकलेचा अविष्कार पाहण्याचा योग आला.
दर वर्षी भुलेश्वर मंदिरात 27 मार्च ते 29मार्च असा सलग 3 दिवस किरणोत्सव असतो. हा किरणोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त मोठ्यां संख्येने गर्दी करतात. गतवर्षी जगभरात कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातल्याने सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद असल्याने श्री भुलेश्वर मंदिर देखील बंद होते. म्हणून यावर्षी भुलेश्वर भक्तांनी किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
आज सकाळी 6 वाजून 51 मिनिटांनी सूर्य किरणांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला तर 7 वाजून 1 मिनिटांनी श्री भूलेश्वरांच्या मूर्तीस स्पर्श करून सूर्य किरण 7 वाजून 5 मिनिटांनी मूर्तीच्या खालील बाजूला सरकले, असा सरासरी 12 मिनिटे सूर्यकिरणांचा अभिषेक झाला तर याच काळात प्रदक्षिणा मार्गावर असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर देखील किरणोत्सव सुरु होता.
श्री भूलेश्वरांच्या मूर्तीवर सूर्य किरण पडल्यानंतर सोनेरी किरणांमुळे सोनेरी दिसत होती. श्री भुलेश्वर यांच्या मूर्तीवर सूर्याची सोनेरी किरणे पडल्यानंतर सर्व भुलेश्वर भक्तांनी ओम नमः शिवाय , हर हर महादेव, भुलेश्वर महाराज की जय असा जयघोष केला व श्री भुलेश्वर महादेवाला कोरोनाचे संकट घालविण्यासाठी साकडे घातले.