पुणे : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी विनोद शिवकुमार यांना 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश धारणी न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात दीपाली यांना वेळीच मदत करू शकलेल्या खासदार नवनीत राणा संतप्त झाल्या आहेत. मात्र त्यांचा संताप दिखावा असल्याचा अप्रत्यक्ष टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी लगावला.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या श्रीनिवासा रेड्डी यांची कार्यालयातील काही महिला खासदार नवनीत राणा यांच्याकडे रेड्डी यांच्या बचावासाठी निवेदन घेऊन आल्या होत्या. पण खासदार नवनीत राणा यांनी या महिला निवेदनकर्त्यांची कानउघाडणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. महिला असून सुद्धा आपण महिलेची बाजू न घेता, रेड्डी सारख्या अधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याबद्दल राणा संताप व्यक्त करताना व्हिडीओमध्ये दिसत होत्या. त्यामुळे राणा यांचा कौतुक होत आहे. मात्र या व्हिडीओवरून चाकणकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो नवनीत राणांच्या सत्काराचा असून दुसरा फोटो वन विभागातील महिलां सुनावतानाचा आहे. मात्र या दोन फोटोमधील एक महिला राणा यांची निकटवर्तीय असल्याचं दाखवण्यात आलं आहे. एकच महिला दोन ठिकाणी कशी ? असा अप्रत्यक्ष प्रश्न विचारत ‘ये पब्लिक है सब जानती है’ अशी फेसबुक पोस्ट चाकणकर यांनी शेअर केली आहे.
तत्पूर्वी खासदार नवनीत राणा यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसते तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केले होते. दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती. तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे चाकणकर यांनी म्हटले होते.