वाघळवाडी – तथाकथित तांत्रिक गुरू आणि अंधश्रद्धांचे भांडवल करून बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात एका बुवाने आपले दुकान थाटले असून गोळा केलेल्या मायेच्या जोरावर राजकारणापासून अन्य अनेक क्षेत्रांवर आपली हुकमतही गाजवत अनेकांची फसवणूक केली आहे.
करणी, भूतबाधा, वशीकरण या खोट्या भास निर्माण करत अंधश्रद्धेच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट करण्याचा गोरख धंदा त्याने मांडला आहे; मात्र भीती व बदनामीपोटी कोणीही पुढे येऊन पोलिसांत तक्रार देण्यास तयार होत नसल्याने पोलिसांनाही कोणतीही कार्यवाही करता येत नाही. किमान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या ठिकाणी येऊन या भोंदू बाबाचा पर्दाफाश करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बारामतीत तालुक्यातील पश्चिम भाग हा बागायती पट्टा म्हणून ओळख जातो. येथील सर्व भाग सुजलाम् सुफलाम् आहे. येथील राहणारे स्थानिक नागरिकही बऱ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांना वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील किरकोळ अडचणीचा फायदा घेत येथे त्यातून मार्गाकडून देत भूतबाधा व करणी वशीकरण अशा खोट्या गोष्टींची भीती दाखवत सामान्यांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारला आहे.
त्या बुवाने आपले दुकान थाटले आहे. सर्वसामान्य लोकांच्या भावनांशी खेळ त्यांना असणाऱ्या जीवनातील अडचणी म्हणजे- मुलीचं लग्न जमत नाही, मुलाला अपत्य होत नाही, जमिनीचा वाद, कोर्टकचेऱ्या अशा असंख्य अडचणींना अंधश्रद्धेची जोड देत तुमच्या कुटुंबावर कोणीतरी जादूटोणा केला आहे, तुमच्या कुटुंबाला भूतबाधा झाली अशा प्रकारची भास निर्माण करत, त्या व्यक्तींकडून किंवा त्या कुटुंबातील लोकांकडून अंधश्रद्धेच्या नावाखाली लाखो रुपये उकळले जातात आहे. ही सर्व माहिती नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बुवाबाजी पीडितांनी, फसवणूक झालेल्या व्यक्तींनी दिली आहे.
असे हेरतो सावज
या बुवाचा महिन्यातील ठराविक दिवशी दरबार होतो या दरबाराची चर्चा परिसरामध्ये आहे. या दरबारामध्ये तो अंगात आल्याचा भास निर्माण करतो. जणू काय स्वतः एक देवाचा अवतारच आहे, असा भास तिथे उपस्थित असलेल्या निर्माण करतो. मग या भक्तांच्या गर्दीमध्ये बसलेली व त्याच्या पैशांवर जगणारी पिल्लावळ बाबांचा जयजयकार करीत व बाबांचे खोटे साक्षात्कार आपल्या तोंडाने वदवून सांगतात.
दरवेळी हे सांगणारा नवीन व्यक्ती असतो. त्यानंतर त्याचे कार्यकर्ते आलेल्या भक्ताला (ग्राहक) हेरतात. ते बाबाला इशाऱ्याने खुणावतात. मग हा बाबा त्या ग्राहकाला तू खूप मोठ्या अडचणीत आहेस, तुला या अडचणीतून फक्त मीच बाहेर काढू शकतो, त्यासाठी तुझ्या घरी यावे लागेल, पण मला सध्या वेळ नाही. पुढच्या तारखा माझ्या इतर भक्तांसाठी दिल्या आहेत. आता एक महिना थांब, असे सांगतो.
त्यानंतर तिथे बसलेले बुवाचे कार्यकर्ते त्या व्यक्तीला बाजूला घेतात व सांगतात बाबांना फार मोठी सिद्धी प्राप्त आहे. तुम्हाला तुमच्या घरातील आणि अडचणीतून बाहेर निघायचे असेल तर बाबा सांगतील ती रक्कम अदा करा, बाबा तुझ्या घरी येतील.
व्हिजीट फी 7 हजार रुपये
सोमेश्वरपासून अगदी चार ते पाच किलोमीटरवर यायचे असेल ता हा बाबा एका भक्ताच्या घरी भेट देण्यासाठी (व्हिजीट फी) सात हजार रुपये घेतो. मग पुढे तो बाबा या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर त्याचे घर बघितल्यानंतर त्याच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
तुझ्यामध्ये भूतबाधा आहे, तुझ्यावर खूप मोठी करणी केली आहे, ही करणी घालवण्यासाठी पुढील अमावस्येला तयारी करावी लागेल, त्यासाठी तीन लाख रुपये खर्च आहे. आगाऊ (ऍडव्हान्स) दीड लाख रुपये दे व अमावसेच्या दिवशी दीड लाख रुपये दे, असे सांगून आपला आर्थिक फायदा करून घेत आहे.
आयकर विभागाला हे दिसणार का?
गळ्यात किलोभर सोनं घालून होर्डिंगबाजी, आलिशान चारचाकी वाहने आणि वर्षभरातून एकदा सोमेश्वरनगर परिसरात वरून हेलिकॉप्टरने रपेट मारणे अशी हौसमौज तो करतो आहे; मात्र यासाठी त्याच्याकडे पैसा येतो कोठून? अन् हा पैसा आयकर विभागाला दिसत नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त?
या बुवाच्या दरबारामध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांची व मोठ्या उद्योजकांचे येणे जाणे असते. त्याचबरोबर या बुवाचे त्या राजकीय पुढारी, उद्योजकांबरोबर अनेक ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केल्याची चर्चा या परिसरात आहे, त्यामुळे या बाबावर पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.