अभिनेता भरत जाधव हे नाव आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वपरिचित आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळी ओळख बनवली आहे. मात्र अभिनय कारकीर्दीस नाटकांपासून सुरुवात करणाऱ्या भारतचा ‘मराठी सुपरस्टार’ भरत जाधव होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता.
भरत जाधवने इंस्टाग्राम पोस्टद्वारे नुकताच जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याकाळी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या आपल्या दिवंगत वडिलांसोबत घडलेला एक किस्सा सांगितलाय.
भरत लिहितो…
“एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते… त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासा दरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या पण वडिल त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले. रात्री घरी आल्या नंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला..”
“ते प्रवासी ‘ऑल द बेस्ट’ च्या प्रयोगाला चालले होते! आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत.. या एकाच गोष्टी साठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. खुप रडलो होतो त्या दिवशी. सुदैवाने तेंव्हा मला १०० रुपये नाईट मिळत होती.. त्या दिवसापासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं.”
“टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर ह्याच एखाद नाटक नाही चाललं तर काय करणार. ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक Honda Accord घेतली आणि त्यांना स्टीअरिंग वर बसवलं त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं. त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या..”
“मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होत ते सगळं सुखं त्यांना देऊ शकलो.अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय. आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे. अण्णा… आज तुम्हाला खुप मिस करतोय.तुमच्या सारखा देव माणुस मी आयुष्यात पाहिला नाही..”